औरंगाबाद – जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी
महाराज यांची सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदींनी भेट घेतली
आहे. सोमवारी दुपारी उभयतांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ आणि स्वामी शांतिगिरी यांच्या भेटीची बातमी 'सांजवार्ता ऑनलाईन'ने शनिवारी दिली होती. या भेटीच्या चर्चेनंतर आता
पंतप्रधानांच्या बंधुंनी थेट स्वामींच्या मठात येऊन त्यांचा आशीर्वाद घेतल्याने औरंगाबादेत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
पंतप्रधान मोदींचे बंधू आणि स्वस्त धान्य
दुकान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद मोदी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर
आहेत. सोमवारी त्यांच्या हस्ते कसाबखेडा येथे पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. यानंतर
ते थेट वेरुळ येथील स्वामींच्या मठात पोहोचले आणि स्वामी शांतिगिरी महाराजांची भेट
घेतली. प्रल्हाद मोदींनी स्वामींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर
दोघांची बंदद्वार चर्चा झाली. जवळपास अर्धातास दोघांमध्ये चर्चा सुरु होती.
शांतीगिरी महाराज योगी आदित्यनाथ यांच्या संपर्कात, 'धर्माच्या माध्यमातून राजकारणाचे शुद्धीकरण करणार'
मोदींवर उधळली स्तुतीसुमने
स्वामी शांतिगिरी महाराज यांनी एक
दिवसापूर्वीच विश्व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेत मोदींवर स्तुतीसुमने उधळली होती.
पंतप्रधान मोदी हे भगवंताचा अवतार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच
दिवशी पंतप्रधानांचे बंधु त्यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
आले आहे. स्वामी शांतिगिरी महाराज हे औरंगाबादेतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा
निवडणूक लढवू इच्छित असल्याची चर्चा आहे. त्यातच राज्याबाहेरील भाजप नेतेही
त्यांच्या संपर्कात असल्यामुळे स्थानिकांचे धाबे दणाणले आहे.
भाजपने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची
तयारी सुरु केली आहे. युती झाली नाही तर भाजपला औरंगाबादेतून तगड्या उमेदवाराची
आवश्यकता आहे. शांतिगिरी महाराजांनी २००९ मध्ये औरंगाबाद लोकसभा लढवली होती.
त्यावेळी त्यांना एक लाख ६२ हजार मते मिळाली होती. महाराजांनी लोकसभा लढवण्याची
इच्छा कधीही लपवून ठेवलेली नाही. त्यातच थेट पंतप्रधानांचे बंधू त्यांच्या भेटीला
आल्याने आता त्यांच्या भाजप उमेदवारीला अधिक बळ मिळत आहे.










